उरुळी कांचन, (पुणे) : भारती विद्यापीठ आयोजित गणित बहिस्थः परीक्षेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या विद्यालयातील आराध्या हरिशंकर गुप्ता हिने 100 पैकी 100 गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
सप्टेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या गणित बहिस्थ परीक्षेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिरातील एकूण 179 विद्यार्थी बसलेले होते. या परीक्षेत इयत्ता 6 वीतील आराध्या हरिशंकर गुप्ता हिने 100 पैकी 100 गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच 163 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 58 विद्यार्थ्यांना विशेष योग्यता श्रेणी प्राप्त झाली आहे.
मुख्याध्यापिका सरिता राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा पार पडली. आराध्या गुप्ता हिच्या या यशाबद्दल संस्था पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, मुख्याध्यापिका व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.