पुणे : जिल्ह्यात रब्बी हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या एकूण सरासरी क्षेत्रात ज्वारी पिकाचे क्षेत्र निम्म्याहून अधिक आहे. यंदा जिल्ह्यात आतापर्यंत ८४ हजार ३२७ हेक्टर अर्थात सरासरीच्या ६३ टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. १६ हजार ४८६ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात एकूण रब्बी पिकांची पेरणी ६९ टक्के झाली आहे. तेलबिया पिकांखालील क्षेत्र नगण्य असल्याने केवळ १२१ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी २ लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. रब्बी ज्वारी हे पुणे जिल्ह्याचे महत्त्वाचे पीक असून, या पिकाखालील सरासरी क्षेत्र १ लाख ३४ हजार ३३६ हेक्टर इतके आहे. एकूण रब्बी क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक क्षेत्र हे ज्वारी पिकाखालील आहे. गोकुळ अष्टमीनंतर जिल्ह्यात ज्वारीच्या पेरण्यांना सुरुवात होते. आतापर्यंत जिल्ह्यात ८४ हजार ३२७ हेक्टरवर ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. सरासरी क्षेत्राच्या हे प्रमाण ६३ टक्के इतके आहे. ज्वारीनंतर जिल्ह्यात गव्हाची लागवड केली जात असून, सरासरी क्षेत्र ३९ हजार ८०३ हेक्टर इतके आहे.
आतापर्यंत २६ हजार ४८६ हेक्टर अर्थात ६७ टक्के क्षेत्रावर गव्हाची लागवड करण्यात आली आहे. हरभरा पिकाखालील सरासरी क्षेत्र ३४ हजार ३३० हेक्टर असून, आतापर्यंत १९ हजार ३१९ हेक्टर अर्थात ५६ टक्के क्षेत्रावरील पेरण्या उरकल्या आहेत. जिल्ह्यात १ लाख ५८ हजार ३४५ हेक्टरवर रख्बी पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. सरासरीच्या तुलनेत ६९ टक्के क्षेत्र पेरणीखाली आले आहे.