मुंबई:भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कोलंबिया येथे सुरू असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत मीराबाईने चीनच्या हौ झिहूआला पराभूत करताना रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
जागतिक स्पर्धेतील मीराबाई चानूचे हे दुसरे पदक आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मीराबाई चानूने ८७ किलो स्नॅच तर ११३ किलो क्लीन एन्ड जर्क प्रकारात वजन उचलले. यापूर्वी सन २०१७ मध्ये मीराबाई चानू यांनी सुवर्णपदक जिंकले होते.
या स्पर्धेत चीनच्या जियांग हुआहुआनं तब्बल २०६ किलो वजन उचलताना सुवर्णपदक पटकावले. मीराबाई चानूने २०० किलो वजन उचलताना रौप्य पदक तर चीनच्याच हौ झिहुआने एकूण १९८ किलो वजन उचलताना कांस्य पदक मिळविले.
मीराबाई चानू यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे.