पुणे : दौंड तालुक्यातील अनेक ठिकाणी बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यातील राहू परिसरातील बिबट्या मादी आणि नानगाव येथील ढगेवस्ती परिसरातील बिबट्या जेरबंद झाला आहे.
त्यात राहू परिसरात गेल्या महिन्याभरापासून मुक्तपणे संचार करून जनावरांवर व पाळीव प्राण्यांवर हल्ले करून धुमाकूळ घालणारी बिबट्या मादी आज सोमवारी पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकली आहे. तर काही दिवसापूर्वी याच परिसरात बिबट्याची तीन लहान पिल्ले मिळून आली होती. यामुळे या भागात बिबट्या असण्याची शक्यता होती. या बिबट्याच्या दहशतीमुळे या भागात अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तर दुसरा बिबट्या दौंड तालुक्यातील नानगाव येथील ढगेवस्ती परिसरात लोकवस्तीच्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करीत होता. त्यामुळे त्या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावला होता. शनिवारी (दि.14) रात्री एक बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान, दौंड तालुक्यातील बहुतांशी गावात बिबट्याचा वावर असून लोक दहशतीखाली आहेत.
पुणे वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार, दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल अंकुश खरात, वनरक्षक शीतल मेरगळ, वनकर्मचारी अरुण मदने आदींनी बिबट्या जेरबंद करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांनी नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी. बिबट्या आढळल्यास त्वरित दौंड वन विभागाची संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्राधिकारी राहुल काळे यांनी केले आहे.
दौंड तालुक्यातील नानगाव येथे एका बिबट्याला जेरबंद करण्यात दौंड वनविभागाला यश आले. तरी कानगाव, कडेठाण, हातवळण या भागात आठ दिवस उलटूनही बिबट्या जेरबंद झाला नाही.
दौंड तालुक्यातील कडेठाण, हातवळण आणि कानगाव या भागात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या भागातील शेतकरी नागरिक आणि महिला त्या बिबट्याच्या दहशतीमुळे भयभीत झाले आहेत. शेतामध्ये काम करण्यास त्या घाबरत आहेत. मागील काही दिवसापूर्वी कडेठाण येथे उसाच्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. बिबट्याच्या हल्लात या महिलेचा मृत्य झाल्याचा दावा या भागातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी केला होता.
या घटनेनंतर दौंड वनविभागाने कडेठाण, हातवळण, कानगाव या भागात तब्बल आठ ठिकाणी पिंजरे लावले आहेत. मात्र पिंजरा लावलेल्या ठिकाणी बिबट्या गुंगारा देत असल्याचे चित्र आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस ऊसतोड सुरू आहे. परिणामी बिबट्याचे निवारा आणि सुरक्षित ठिकाण असलेल्या उसाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबट्या हा स्थलांतरित होत असून शिकारीसाठी नरभक्षक बनत चालल्याचे चित्र आहे.