पुणे : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील लढाईत महाविकास आघाडीचं पानीपत झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने निवडणूक लढवली होती. मात्र, मविआला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 10 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे राज्यात सर्वत्र बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘देवाभाऊंनी दाखवून दिलं, देवाभाऊच महाराष्ट्राचे खरे चाणक्य’ अशी बॅनरबाजी सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. अशातच आता बारामतीमधील असाच एक बॅनर वादग्रस्त ठरला असून बारामती शहरात झळकावलेला बॅनर एका अज्ञात व्यक्तीने पेटवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बारामती नगर परिषदेसमोर लावण्यात आलेला बॅनर अज्ञाताने पेटवला आहे. मात्र, बॅनर पेटवल्यानंतर तो अर्धा जळाला असून अर्धाच शिल्लक राहिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बारामतीत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भाजपच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला होता.
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चाणक्य असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे बारामतीमधील काही अज्ञातांनी हा बॅनर पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर भाजप कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तर, पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.