नागपूर: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात १६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून यंदा आठ हजारांवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील इतर जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी आणि एसआरपीएफ कंपन्यांचाही समावेश आहे.
अधिवेशनानिमित्त शहरात राज्याचे मंत्रिमंडळ आणि राजकीय नेत्यांची वर्दळ असते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसह मोर्चा आणि इतर विभागांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त लावण्यात येतो. यंदा हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळ, रविभवन, नागभवन, मोर्चा स्टार्टींग आणि स्टॉपिंग पॉइंटसह शहरात चोख बंदोबस्त लावण्यात येतो. या बंदोबस्तासाठी राज्यातील इतर जिल्ह्यांतील पोलीस उपायुक्तांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरात दाखल होणे सुरू झाले आहे.
यंदा बंदोबस्तासाठी कमांडोंना तैनात करण्यात येणार आहे. अधिवेशनाचा बंदोबस्त ‘हायटेक’ आणि ‘स्मार्ट’ राहणार असून पोलीस अधिकारी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात राहणार आहेत. अधिवेशनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी सकाळपासून बैठकांचा सपाटा लावून आढावा घेतला. यावेळी ठिकठिकाणाची सुरक्षाव्यवस्था आणि पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपविण्यात आली. याशिवाय फोर्स वन, गुप्तचर विभाग, डीबी पथक, ३० बॉम्बशोध, नाशक पथके, डॉग स्क्वॉड आणि विविध पथकांसह मोचां पॉइंटवर ‘य’ उभे करण्यात येणार आहे.
शहरात पाच हजारांवर पोलिसांचा समावेश
यंदा शहरातील १० पोलीस उपायुक्त, ५३ साहाय्यक उपायुक्त, १२५ पोलीस निरीक्षक, ४०६ साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकासह ३ हजार १८१ जवानाचा समावेश आहे. यामध्ये ७५२ महिला पोलीस जवानांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा राज्य राखीव दलाच्या ५ कंपनी, एक हजारांवर होमगार्ड असा साडेपाच हजार पोलिसांचा समावेश आहे.
इतर जिल्ह्यांतून तीन हजारांवर पोलिसांची कुमक
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित शहरासह राज्यातील इतर जिल्ह्यांतील पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यात १० पोलीस उपायुक्त, ३८ साहाय्यक पोलीस आयुक्त, ८० पोलीस निरीक्षक २३५ साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकासह २ हजार ७०० जवानांचा समावेश आहे.