उरुळी कांचन, (पुणे) : दरवर्षीप्रमाणे यंदाही उरुळी कांचन (ता. हवेली) येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने गरजुंसाठी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी (ता. 14) मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात 5 जोडप्यांचे विवाह पार पडले असून, वधु-वरांना लग्नाचा पोशाख, संसारोपयोगी वस्तू भांडी, बूट, चप्पल व सर्वांच्या भोजनाची व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली होती.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील कस्तुरी मंगल कार्यालयात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामुदायिक विवाह सोहळा विविध स्तरातील मान्यवरांच्या साक्षीने व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यंदाचे हे सामुदायिक विवाह सोहळ्याचे 19 वे वर्ष आहे. शेतकऱ्यांनी मुलामुलींच्या लग्नासाठी कर्ज काढू नये आणि बँका, पतसंस्था किंवा सावकारांच्या कठोर वसुलीस त्यांना तोंड द्यावे लागू नये, म्हणून नैतिक जबाबदारी स्विकारत विवाह सोहळ्यास सुरुवात कस्तुरी प्रतिष्ठानतर्फे केली जाते.
यावेळी कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, उपाध्यक्ष संतोष भन्साळी, संस्थेचे सचिव, परिसरातील आजी माजी सरपंच, उपसरपंच सदस्य तसेच हजारो वऱ्हाडी, पाहुणे, मान्यवर उपस्थित होते. वधू-वरांची मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात आली. कोणता धर्म, जात नाही तर केवळ आयुष्यभर एकमेकांना साथ देण्यासाठी सात फेरे घेत दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर मंगळवारी 5 जोडप्यांनी रेशीमगाठी बांधल्या.
दरम्यान, लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या वधूवरांच्या नातेवाइकांना व उपस्थित असलेल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली होती. विवाहात सहभागी नवदांपत्यास मणी मंगळसूत्र, नवरदेवाचा सफारी, संसारोपयोगी भांडी, बूट व चप्पल देण्यात आली.
याबाबत बोलताना कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे म्हणाले, “गरिबांची लग्न झाली पाहिजे. सर्वसामान्य नागरिक हा कर्जबाजारी नसावा. विवाह सोहळ्यात लग्न झाल्याने खर्चही कमी येतो. गरिबांनी या अशा विवाह सोहळ्यात सहभागी होऊन लग्न केली पाहिजेत. कस्तुरी प्रतिष्ठानचे पहिल्यापासूनच ब्रीदवाक्य आहे. प्रार्थना करणाऱ्या ओढांपेक्षा मदत करणारे हात पवित्र असतात जेवढे आपल्या हाताने करता येते तेवढे आपण केले आहे.”