शिवाजीनगर, (पुणे) : युवतीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणातून एकाला पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एस.बि.राठोड यांच्या कोर्टाने हा निकाल दिला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली आहे.
अश्विन सुधीर गायकवाड असे जामिनावर मुक्त झालेल्या आरोपी चे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवतीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणातून आरोपी अश्विन गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 21 ऑक्टोबर 2024 ला फिर्यादी ह्या कामानिमित्त सांगवी येथे गेल्या असता यावेळी त्यांना नातीने फोन करून त्यांच्या मुलीने छतावर गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपी अश्विन गायकवाड याच्या विरुद्ध भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या फिर्यादी वरून भोसरी पोलिसांनी अश्विन गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केले होते.
आरोपी येरवडा जेलमध्ये असताना त्याने अॅड. नितीन भालेराव यांच्याद्वारे जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपीने कुठलाही गुन्हा केला नसून आरोपी आणि मयताचे प्रेम संबंध होते. त्यांना लग्न करायचे होते परंतु मयताच्या घरच्यांना आरोपींचे व मयताचे प्रेम संबंध मान्य नसल्याने मयताने आत्महत्या केली आहे.
दरम्यान, आरोपीने मयताला कधीही आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेले नाही असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला. आरोपी पक्ष आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.बि.राठोड यांनी आरोपीस अटी व शर्थीवर जामिन मंजूर केला आहे. सदर कामी अॅड.मयूर चौधरी आणि अॅड.अजीज इनामदार यांनी मदत केली.