वाघोली : रुग्णवाहिकेतून मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाऊ नका, असे सांगूनही न ऐकल्याने मित्राने दारूच्या नशेत रुग्णवाहिका चालकाच्या दिशेने दोन राउंड फायर केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. 12) रात्री बकोरी फाटा (ता. हवेली) येथे हि घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असून तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे.
विशाल रामदास कोलते (रा. बकोरी गाव, ता. हवेली), संदिप कैलास हरगुडे (रा. केसनंद ) व अमोल हरगुडे (रा. केसनंद ) असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक सुधाकर अरुण कानडे (वय -35, रा. कात्रज ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल कोलते, अमोल हरगुडे व संदिप कैलास हरगुडे हे बकोरी फाट्यावरील एका बियर बार मध्ये दारू पित बसले होते. रुग्णवाहिका चालक सुधाकर हे रुग्णवाहिका घेवून संदिप हरगुडे याला लोणी काळभोर येथील व्यसनमुक्ती केंद्रात नेण्यासाठी आले होते. मात्र आपल्याला नेवू नये यासाठी संदीप याने विशाल याला सांगितले होते.
यावेळी विशालने आपल्या परवानाधारक रिव्हॉल्वरमधून रुग्णवाहिका चालक सुधाकर कानडे याच्या दिशेने सरळ दोन गोळ्या झाडल्या. मात्र सुदैवाने त्या चालकाला लागल्या नाही. नंतर विशाल व अमोल याने रुग्णवाहिकेवर दगडफेक करून काचा फोडल्या. घटनेची माहिती कळताच वाघोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, वाघोली पोलिसांनी विशाल याच्या घराची झडती घेतली असता 16 जिवंत काडतुसे व दोन रिकामे काडतुसे आढळून आले. पोलिसांनी घरातील काडतुसे, त्याच्याकडील रिव्हॉल्वर त्यातील तीन जिवंत काडतुसे, तीन रिकामे काडतुसे, एक थार वाहन व एक कार जप्त केली आहे. पुढील तपास वाघोली पोलीस करीत आहेत.