अजित जगताप
मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे भारत देशात समतेचा नारा देण्यात आलेला आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच सर्वसामान्य भारतीय नागरिकांना संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळाला. त्यांच्या कार्याचा नेहमीच गौरव राहील असे प्रतिपादन डोंबिवली रेल्वे स्थानकाचे प्रबंधक श्री पी. के. दास यांनी केले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डोंबिवली रेल्वे स्थानक येथे झालेल्या अभिवादन कार्यक्रमांमध्ये श्री दास बोलत होते. यावेळी रेल्वेचे सेवानिवृत्त मुख्य तिकीट निरीक्षक प्रेमानंद जगताप, डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाणे, ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सामाजिक कार्यकर्ते भिमराव खंदारे, राहुल तलवारे, रमेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे महिलांना भारत देशात संधी मिळाल्यामुळे महिला उच्च पदस्थ झालेले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव हे आमचे कर्तव्य आहे. अशा शब्दात व. पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आंबेडकर अनुयायांनी व प्रवासी वर्गाने ही डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन व प्रस्ताविक रेल्वेचे अधिकारी तथा प्रेमानंद जगताप,भिमराव खंदारे यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज आत्माराम आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले. युवा नेते सुशांत खंदारे यांनी आभार मानले.