सोलापूर : मुंबईतील एका तरुणाने जुळ्या बहिणीशी एकाच मांडवात लग्न केल्याने लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मेडियावावर चांगलेच व्हायरल झाले होते. या विवाहाची राज्यभर एकच चर्चा रंगली होती. मात्र, महिला आयोगाने नवरदेवाची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि दुसऱ्याच दिवशी या नवरदेवाच्या आनंदावर विरजण पडले.

महिला आयोगाच्या वतीने पोलिसांना या नवरदेवाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. या चौकशीत मिळत असलेल्या माहितीमुळे पोलीस देखील चक्रावून गेले. नवरदेव अतुल अवताडे याचे आधीच लग्न झाले असून आता त्याने जुळ्या बहिणीसोबत लग्न केले असल्याचे निष्पन्न झाले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहून नवरदेव अतुलच्या पहिल्या पत्नीने थेट राज्य महिला आयोगाकडे याची तक्रार केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसारच ही चौकशी झाली असून आता नवरदेव चांगलाच कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. अतुल अवताडेच्या सोबत सोलापुरातील जुळ्या बहिणींवर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलीस अतुलची कसून चौकशी करत आहेत.
अतुल अवताडे या माळशिरस तालुक्यातील महाळुंग या गावाचा रहिवासी आहे. त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. २ डिसेंबर २०२२ रोजी अतुलने पिंकी व रिंकी मिलींद पाडगावकर या जुळ्या बहिणींशी विवाह केल्याने एकदम चर्चेत आला होता. जन्मापासून एकत्र राहाणाऱ्या या बहिणीना शेवट्पर्यंत्न सोबतच राहायचं असल्याने त्यांनी एकाच मुलाशी विवाह केला होता.







