मुंबई : राज्य शासनातील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागांवर कंत्राटाऐवजी कायमस्वरूपी भरती करा, अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. कुर्ला येथील बस अपघातीचा दाखला देऊन कंत्राटी नोकरभरतीमुळे प्रशासकीय गुणवत्तेला धोका निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार हाती घेताच पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकपणावर भर दिला आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत नवीन भरतीचे प्रमाण अत्यल्प आहे. रिक्त पदे कंत्राटी पद्धतीऐवजी लोकसेवा आयोग, जिल्हा निवड मंडळे आदी विहित मार्गांनी कालमर्यादेत भरण्यात यावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे. बदलापूरमधील चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निंदनीय घटनेत तसेच कुर्ला येथे झालेला बेस्ट बसच्या अपघाताला कारणीभूत कर्मचारीही कंत्राटी आहेत, ही गंभीर बाब आहे. कंत्राटी पदभरती करताना उमेदवारांची पात्रता, बौद्धिक, शारीरिक व मानसिक आरोग्य चाचणी, प्रशिक्षण, अनुभवाची कमतरता यांचा विचार नीटपणे केला जात नाही, याकडेही या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.