उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाटा परिसरात टेम्पो व सिमेंट बल्करच्या विचित्र अपघातात टेम्पोचालक व बल्कर चालक अशा दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी (ता. 10) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
अपघातातील मयत झालेल्या दोघांचीही नावे अद्याप समजू शकली नसून उरुळी कांचन पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. यातील एक मयत हा दौंड तालुक्यातील पडवी या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक हा सोलापूर बाजूकडून पुण्याच्या बाजूकडे निघाला होता. यावेळी ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व ट्रक हा दुचाजक तोडून सोलापूर बाजूकडे निघालेल्या बल्करवर जाऊन आदळला.
दरम्यान, घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी नागरिकांच्या व उरुळी कांचन पोलिसांच्या मदतीने दोन्ही चालकांना गाडीतून बाहेर काढले. यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता दोघांचेही उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.