पुणे : पुण्यातून एक अजब प्रकार समोर आला आहे. सोसायटीच्या आवारातील तीन मांजरे जंगलात सोडण्यासाठी सोसायटीच्या फंडातून २ हजार ४०० रुपये मंजुर केले. या प्रकरणी सोसायटीच्या चेअरमनसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्राणीप्रेमी कार्यकर्ता मोनिका छेत्री (वय- ३०, रा. लोहगाव) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी एक महिला, शेख, अर्जुन प्रसार, चेअरमन लोखंडवाला (सर्व रा. गंगामेल सोसायटी, सोपानबाग) यांच्याविरोधात प्राणीक्रुरता अधिनियम १९६० चे कलम ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी प्राणीप्रेमी महिला या व्हॉटसअपवर चॅटींग चेक करत होत्या. त्यावेळी त्यांना एक मेसेज आला. त्यामध्ये सोसायटीच्या आवारात फिरणारी तीन मांजरे सोसायटीच्या सदस्यांनी पंधरा किलोमीटर लांब जंगलात सोडून देण्यात आली आहेत. यासाठी एका व्यक्तीला प्रत्येकी मांजराच्या पाठीमागे ८०० रुपये दिले आहेत. त्यांना एका पोत्यात भरुन निर्दयपणे रिलोकेटेड करण्यात आली आहेत.
दरम्यान, त्यांनी याची खातरजमा केल्यावर सोसायटीचे चेअरमन लोखंडवाला यांनी मांजरे जंगलात सोडण्यासाठी सोसायटीच्या फंडातून २४०० रुपये मंजुर केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यानूसार आरोपींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक इनामदार करीत आहेत.