उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पासून जवळ असलेल्या प्रतीपंढरपूर नावाने ओळख असलेले डाळिंब बन (ता. दौंड) येथील विठ्ठल मंदिरातील 20 ते 25 हजार रुपये रक्कम असलेली दानपेटी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. रविवारी (ता. 08) मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सदरचा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याप्रकरणी डाळिंब बनचे सरपंच बजरंग म्हस्के यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डाळिंब येथील श्री विठ्ठल मंदिर दररोज रात्री बंद करण्यात येते. नेहमीप्रमाणे पुजारी शनिवारी (ता. 07) मंदिर बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात चोरट्याने मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.
यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीमागील मखर चांदीची पॉलिश असून मखर म्हणून त्यांनी तोडफोड केली. मंदिरातील दक्षिणा पेटी चोरून नेली असून त्या पेटीतील पैसे घेऊन ती पेटी 200 किमी अंतरावर फेकून देण्यात आली. रविवारी सकाळी पुजारी सहा वाजण्याच्या सुमारास मंदिर उघडून पूजा करण्यासाठी आले असता त्यांना कुलूप तुटून पडल्याचे दिसून आले.
दरम्यान, आत जाऊन पाहणी केली असता मंदिरातील दक्षिणा पेटी दिसून आली नाही. तसेच चांदीची पॉलिश केलेल्या मखरेची तोडफोड केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी माहिती घेऊन यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत बोलताना डाळिंब गावाचे सरपंच बजरंग म्हस्के म्हणाले, “मंदिरात झालेल्या चोरीमुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा लवकरात लवकर तपास करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. डाळिंब गावामध्ये चोरीचे वारंवार प्रकार घडत असून पोलिसांनी डाळिंब गावामध्ये फेरी वाढविण्यात यावी.”