विशाल कदम
लोणी काळभोर (पुणे)- पुर्व हवेलीसह संपुर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या “सरपंच” पदासाठी सत्ताधारी नवपरीवर्तन पॅनेलचे प्रमुख चित्तरंजन गायकवाड व विरोधी जनसेवा पॅनेलच्या उमेदवार कल्पना बाबासाहेब काळभोर या दोन प्रमुख उमेदवारांच्यासह तब्बल पाच जणांचे उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छानणीत वैध ठरले आहेत. सरपंचपदासाठी पाच उमेदवारी अर्ज असले तरी, सरपंच पदाची निवडणुकही चित्तरंजन गायकवाड व कल्पना काळभोर यांच्यातच थेट होण्याची चिन्हे आहेत. चित्तरंजन गायकवाड यांच्या कुणबी जातीच्या प्रमापत्राबाबत विरोधी पॅनेल घेतलेले आक्षेप प्रशासनाने फेटाळल्याने, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तरी नवपरीवर्तन पॅनेलला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आज (सोमवारी) उमेदवारी अर्जाची छाननी पार पडली असली तरी, निवडणुकीच्या रिंगणातुन बाहेर पडु इच्छीणाऱ्यांना बुधवारी (ता. ७) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. चित्तरंजन गायकवाड व कल्पना काळभोर यांच्यासह पाच जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले असले तरी, प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात नेमके कोण उभे कोण राहणार? हे बुधवारी तीन वाजता समजणार आहे. सध्याचे राजकीय वातावरण पहाता सरपंचपदाची लढत ही चित्तरंजन गायकवाड़ व कल्पना काळभोर या दोन तगड्या उमेदवारांमध्ये होण्याची चिन्हे असुन, मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत दोन्ही बाजुनी साम, दाम व दंड ही तिन्ही गोष्टींचा वापर होण्याची शक्यता आहे.
पुर्व हवेलीसह संपुर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असुन, मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही सरपंच हा थेट जनतेतुन निवडला जाणार आहे. सरपंचपदासाठी नवपरीवर्तन पॅनेलचे उमेदवार म्हणुन चित्तरंजन गायकवाड तर विरोधी जनसेवा पॅनेलच्या वतीने कदमवाकवस्तीचे विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर यांच्या पत्नी, कल्पना काळभोर या दोन प्रमुख उमेदवारांच्यासह बिना तुषार काळभोर, अर्चना श्रीकांत कदम, राजेंद्र दत्तात्रेय हिंगणे या पाच जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
दरम्यान, उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या वेळी नवपरीवर्तन पॅनेलचे प्रमुख व सरपंचपदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड यांच्या कुणबी प्रवर्गाच्या दाखल्याबाबत, विरोधी जनसेवा पॅनेलच्या वतीने आक्षेप नोंदविला होता. याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर सुनावणीही झाली. यात चित्तरंजन गायकवाड यांचा कुणबी दाखला वैध की अवैध याबाबतचा निर्णय घेण्याबाबतचे अधिकार जातपडताळणी समितीला असल्याने, प्रशासनाने जनसेवा पॅनेलचा आक्षेप फेटाळुन लावला. त्यामुळे चित्तरंजन गायकवाड यांना पहिल्या टप्प्यात तरी दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे जनसेवा पॅनेलने याबाबत न्याय मिळावा, यासाठी जातपडताळणी समितीकडे जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
उमेदवारी अर्ज वैध ठरल्याबाबत बोलतांना चित्तरंजन गायकवाड म्हणाले, कुणबी प्रवर्गाच्या दाखला योग्य असतानाही, विरोधी पॅनेलच्या लोकांनी विरोधाला विरोध म्हणुन आक्षेप नोंदविला होता. या आक्षेपांना योग्य पातळीवर उत्तर देण्यास आम्ही तय्यार आहोत. विरोधी पॅनेलने माझ्या उमेदवारी अर्जाबाबत आक्षेप नोंदविण्याऐवजी मतदारांच्या समोर जाऊन न्याय मागण्याची गरज आहे. मतदार जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. मागील पाच वर्षाच्या काळात झालेली विकासकामे आगामी निवडणुकीत आम्हाला न्याय देणार आहेत. विरोधक ज्या पातळीवर उतरतील, त्या पातळीवर उत्तर देण्याची तयारी असल्याचेही गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, कुणबी प्रवर्गाच्या दाखल्याबाबत बोलतांना जनसेवा पॅनेलच्या सरपंच पदाच्या उमेदवार कल्पना काळभोर म्हणाल्या, चित्तरंजन गायकवाड यांनी कुणबी प्रवर्गाचा दाखला बोगस असल्याचे पुरावे आज आम्ही दिले होते. मात्र प्रशासनाला कुणबीच्या दाखल्याच्या खऱेखोटेपणा बाबत निर्णय़ घेण्याचा अधिकार नसल्याने, प्रशासनाने जातपडताळणी अधिकाऱ्याकडे जाण्याचा सल्ला आम्हाला दिला आहे. आम्ही त्याही ठिकाणी योग्य पुराव्यासह दाद मागीतली आहे. कुणबी प्रवर्गाच्या दाखल्यासारखेच सत्ताधारी पक्षाने खोटे बोलुन, मागील पाच वर्षात नागरीकांची दिशाभुल केलेली आहे. मतदारांचा मिळणार पाठींबा व गावातील वरीष्ठ नेत्यांचे पाठबळ पहाता, आमच्या पॅनेलचा व माझा विजय निश्चीत आहे.