पुणे : वाहतूक व्यवस्थेमध्ये सर्वांत दुर्लक्षित ठरलेल्या पादचाऱ्याला महत्त्व मिळवून देण्यासाठी पुणे महापालिकेने गेल्या चार वर्षांपासून ११ डिसेंबर हा दिवस पादचारी दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली आहे. त्या पार्शवभूमीवर लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौक ते गरुड गणपती चौक हा भाग या दिवशी वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
लिंबराज महाराज चौक (नगरकर तालीम चौक) ते गरुड गणपती चौक दरम्यान सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
पुणे महापालिकेकडून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, याठिकाणी नागरिकांसाठी करमणुकीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच हॅप्पी स्ट्रीटचे खेळ आणि रस्ता सुरक्षाबाबत कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.
या कार्यक्रमासाठी हा रस्ता वाहनविरहित करून तो आकर्षक पद्धतीने सजवण्याचे काम पथ विभागातर्फे होणार आहे. ११ डिसेंबर रोजी जास्तीत जास्त नागरिकांनी लक्ष्मी रस्त्यावर यावे, यासाठी महा मेट्रोमार्फत कसबा आणि मंडई मेट्रो स्थानकापासून, पुणे मनपा मेट्रो स्थानकापर्यंत खास सायकलीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पीएमपीएल कडून जादा बससेवा पुरविण्यात येणार आहे. युनायटेड वे मुंबईतर्फे लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षेबाबत कार्यशाळा आयोजित केली आहे.
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे :
- लक्ष्मी रस्त्याने नगरकर तालीम चौकातून टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी नगरकर तालीम चौकातून डावीकडे वळून बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
- कुमठेकर रस्त्याने लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी शनिपार चौक (चितळे काॅर्नर) येथून वळून बाजीराव रस्तामार्गे अप्पा बळवंत चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
- नारायण पेठेतील लोखंडे तालीम चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी केळकर रस्ता, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.