उरुळी कांचन, (पुणे) : शेतात लागवड केल्यानंतर विक्रीला जाण्यापर्यंत शिंदवणे (ता. हवेली) येथील शेतकऱ्यांनी गुलछडी फुलांची शेती सांभाळली. नेमके फुले विकून पैसे मिळण्याची वेळ येताच अज्ञात चोरटे मागील तीन ते चार दिवसांपसून शेतातून फुले चोरून घेऊन जात आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत.
शिंदवणे येथील शेतकरी अविनाश कोंडीबा शितोळे व बंडू शांताराम शितोळे (रा. शितोळे) मळा परिसरातील या दोघांनी त्यांच्या शेतात गुलछडी फुलांची लागवड केली आहे. या लागवडीसाठी त्यांनी खर्चही भरपूर केला होता. या शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीला चांगले यश मिळून चांगले पैसे मिळतील या आशेने त्या झाडांची जपणूक केली होती. सध्या हडपसरसह पुण्यातील मार्केटला गुलछडीच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळत आहे.
मागील तीन दिवसांपासून त्यांनी लागवड केलेल्या व तोडणीसाठी आलेल्या गुलछडी फुलांची थोड्या प्रमाणात चोरी होत असल्याचे शितोळे यांच्या लक्षात आले होते. मात्र, शुक्रवारी (ता. 06) सकाळी फुले तोडण्यासाठी गेले असता त्यांच्या शेतातील गुलछडीच्या झाडांची फुले अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. तसेच झाडे अस्ता व्यस्त पडलेल्या अवस्थेत दिसून आली. यावरून नक्कीच आपल्या शेतात कोणीतरी फुलांची चोरी करीत असल्याची खात्री झाली.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी फुले तोडण्यासाठी शेतकरी अविनाश कोंडीबा शितोळे व बंडू शांताराम शितोळे गेले असता त्यांच्या अगोदरच अज्ञात चोरांनी फुलांची चोरी करून पसार झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेतकरी अविनाश शितोळे व सामाजिक कार्यकर्ते गणेश शितोळे म्हणाले की, मागील तीन ते चार दिवसांपासून फुले चोरून नेल्याचा प्रकार सुरु आहे. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. मात्र चोरट्यांनी उच्छाद मांडला तर पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे.