दौंड: दौंड बाजार समितीच्या केडगाव येथील उपबाजारात कांद्याची आवक वाढली. दरात प्रति क्विटल पाचशे रुपयांची वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. कांद्याची १.१८५ क्विंटल आवक झाली. प्रतवारीनुसार किमान ८०० रुपये, तर कमाल ७००० प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची १,०१० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतवारीनुसार किमान ८०० रुपये तर कमाल ६,५०० प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह केडगाव, यवत व पाटस येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक आवक स्थिर असून, बाजारभाव तेजीत आहेत. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली. लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने सध्या बाजारभाव तेजीत आहे. दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १३,१९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० रुपये, तर कमाल १,२०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ६,८९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० रुपये, तर कमाल १,३०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.
केडगाव येथे लिंबाची ११६ डाग आवक झाली, प्रतवारीनुसार किमान २०१ व कमाल ४६१ रुपये प्रति डाग असा भाव मिळाला आहे. थंडीमुळे निंबाला मागणी कमी होती. मागील आठवड्यात लिंबाची ६८ डाग आवक होऊन प्रतवारीनुसार किमान ४०० व कमाल ६०१ रुपये डाग असा भाव मिळाला होता.