पुणे : चारचाकी खासगी वाहनांसाठी लवकरच सुरू होणाऱ्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरून राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने केले आहे. मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) सोमवारी (दि. ९ डिसेंबर) सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच वाजण्यादरम्यान कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतींसह जमा करणे आवश्यक राहील. एकाच क्रमांकाकरिता जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. लिलावाचे डीडी १० डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्यापर्यंत स्वीकारले जातील व प्राप्त अर्जाचा लिलाव दुपारी ४ वाजता सहकार सभागृहात करण्यात येईल.
पसंती क्रमांकाची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित मालिका ऑनलाइन सुरू करण्यात येणार आहे. पसंती क्रमांक आरक्षित करण्याकरिता संकेतस्थळावर, नाव व आधार संलग्नित मोबाईल क्रमांक टाकून नावनोंदणी करावी व त्यानंतर अर्ज व शुल्क भरणा करून पसंती क्रमांक आरक्षित करता येईल, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.