यवतमाळ : मकर संक्रांत जवळ येताच पतंग उडविण्याचा मोह अनेकांना सुटतो. त्यामुळे बाजारपेठेत पतंग व मांजा विक्रीस येतो. राज्यात नॉयलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी आहे. परंतु, सध्या याच मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. त्यामुळे नॉयलॉन मांजा विक्रीला ‘ढिल’ कुणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मकर संक्रांत काळात पतंग अनेकजण उडवितात. त्यात बच्चे कंपनी आघाडीवर असते. जानेवारी महिन्यात संक्रांत आहे. त्या पार्श्वभूमीवर आकाशात पतंग उडताना दिसत आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने बाजारपेठेत विविध पतंग विक्रीस आल्या आहे. शिवाय पतंग उडविण्यासाठी लागणारा मांजा (धागा) देखील उपलब्ध आहे. पतंग उडविताना कुणाला मांजापासून दुखापत होऊ नये, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे पतंग उडविताना मांजामुळे अनेकांना दुखापत झाली तर पक्ष्यांवरही ‘संक्रांत’ आल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहे.
दरवर्षी अशा घटना नित्याच्याच झाल्या आहे. नॉयलॉन आणि चायना मांजामुळे अशा अपघातांच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने त्याबाबत ठोस पावले उचलली. त्यातूनच चायना व नॉयलॉन मांजा विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली. मात्र, बंदीनंतरही नॉयलॉन मांजाची सर्रास विक्री करण्यात येत आहे. हा प्रकार राज्यभरातच सुरू असून, त्यातूनच दुखापतीच्या घटना घडत आहे.
पोलिसांनी धाडसत्र राबवून काही ठिकाणांहून नॉयलॉन मांजा जप्त केला. कारवायांनंतरही विक्रेते मांजाचा व्यापार करीत आहे. होलसेल व्यापाऱ्यांनी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नॉयलॉन मांजाचा मोठा ‘स्टॉक’ करून किरकोळ विक्रेत्यांना विक्री सुरू केली आहे. त्यातूनच आकाशात उडणाऱ्या पतंगांना नॉयलॉन मांजा दिसत आहे. हा संपूर्ण प्रकार पाहता, राज्यभरात विशेष मोहिमेतून धाडसत्र राबवून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.