पुणे : सोरतापवाडी (ता. हवेली) येथे गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या सासू-सुनेला अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (ता.३) अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख १२ हजार रुपये किंमतीचा तब्बल २० किलो गांजा जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरतापवाडी परिसरात गांजा विक्री करण्यासाठी दोन महिला येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने सोरतापवाडी परिसरातील चोरघे वस्ती येथे सापळा रचला. तेव्हा दोन महिला डोक्यावर पिशवी घेऊन जात असताना संशयास्पदरीत्या आढळून आल्या.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता नायलॉनच्या पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये सुतळीने बांधलेला तब्बल ४ लाख १० हजार २०० रुपयांचा २० किलो ६१० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. याप्रकरणी दोन्ही आरोपींच्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एनडीपीएस. अक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, सुजीत वाडेकर, मनोज साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी आदींनी केली आहे.