पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश माझिरे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हकालपट्टी केली होती. या हकालपट्टी नंतर माझिरे यांनी थेट मनसेलाच ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. मनसे नेते वसंत मोरे यांचे नीलेश माझिरे हे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
माझिरे यांच्या जय महाराष्ट्र नंतर सुमारे ४०० कार्यकर्त्यांनी देखील मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे मनसेला मोठे भगदाड पडल्याचे बोलले जात आहे.
मागील महिन्याचा २८ तारखेला राज ठाकरे यांनी माझिरे यांची हकालपट्टी केली होती. वसंत मोरे यांचे खंदे समर्थक असलेल्या माझिरे यांची हकालपट्टी झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहर मनसे समोरील आव्हाने वाढली आहेत. या हकालपट्टीने मनसेत देखील फुटीची दुही निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात शहरातील मनसे नेते वसंत मोरे यांनी देखील पक्षात नाराजीचा सूर लावला होता.
पक्षातील पदाधिकारी विश्वासात घेत नसून बैठकांना बोलवत नाहीत. मेळाव्यांना, सभांना गेलो तरी भाषणाची संधी देत नसल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला होता.
पालिका निवडणुकीसाठी पक्षाने कोणतीही तयारी केलेली नाही, आज निवडणूक लागल्यास पक्षाकडे निवडणुकीला उभे करता येतील एवढे उमेदवार देखील नसल्याचे म्हणत मोरेंनी पक्षाला घराचा आहेर दिला होता.