विशाल कदम
लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील तीर्थक्षेत्र रामदरा ते हडपसर बससेवा बंद झाल्याने शालेय विद्यार्थी, शेतकरी, पर्यटक व भाविक भक्तांचे हाल मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. त्यामुळे बससेवा पूर्वरत करावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
लोणी काळभोर हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून जवळपासच्या १० हून अधिक गावांचा कारभार येथून हाकला जातो. लोणी काळभोर येथे मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, दवाखाने, सरकारी व निमसरकारी कार्यालये, पोलीस ठाणे, नागरिकांच्या सेवेसाठी अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना बी- बियाणे, खते व शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी व विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी लोणी काळभोरला यावे लागते. या ठिकाणी येण्यासाठी नागरिकांना व विद्यार्थ्यांना सर्वात सुखकर मार्ग म्हणजे बससेवा होती. मात्र बससेवा बंद झाल्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागत असून आता वाहतीकीचे अद्याप कोणतेही साधन उपलब्ध नाही.
पुणे – सोलापूर महामार्गावर पुण्यापासुन अठरा किलोमीटर अंतरावर लोणी काळभोर ( ता. हवेली) गावाच्या दक्षिणेला डोंगराच्या पायथ्याशी रामदरा हे तीर्थक्षेत्र आहे. विविध प्रकारच्या झाडांच्या हिरवाईमध्ये व निळ्याशार पाणी असलेल्या तलावाच्या काठावर व डोंगराच्या पायथ्याशी रामदरा वसलेले आहे. या ठिकाणी जिल्ह्यासह राज्यातील अनेक पर्यटक भेट देण्यसाठी येतात. पीएमपीएमएलने नागरिकांच्या सेवेसाठी बससेवा हि सुरु केली होती. मात्र बससेवा बंद केल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मागील काही महिन्यांपूर्वी संप घेतला होता. त्या कालावधीत प्रवास्यांच्या सेवेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने नव्याने बससेवा सुरु केली होती. मात्र ग्रामीण भागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बस मार्गांच्या संचालनासाठी येत असलेल्या खर्च व या मार्गांपासून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाने लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा ते हडपसर यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १२ मार्गावरील बससेवा शनिवार (ता.३) पासून बंद केली आहे.