नागपूर : अगदी काही वेळापूर्वीच महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामध्ये ते बोलताना म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मी त्यांना सांगितलं की निर्णय घेताना माझी अडचण आहे असं वाटू देऊ नका, केंद्रीय नेतृत्व म्हणून जसा तुमचा निर्णय भाजपला मान्य असेल तसा तो आम्हालाही मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
महायुतीचे आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. तसेच त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो. कालपासून विरोधी पक्षातील लोकं हे शिंदे यांच्याबद्दल ते नाराज असल्याच्या अफवा उठवल्या गेल्या होत्या. एकनाथ शिंदे सारख्या कर्तबागर व्यक्तीबद्दल त्यांच्या व्यक्तीमत्त्वावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले गेले. पण शिंदे यांनी महायुतीचे नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे या महाराष्ट्रातील जनतेला आणि राज्यातील सर्व जनतेला पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह तसेच केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील, त्याला पूर्ण समर्थन राहील असं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे. महायुती म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. त्यामुळे विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफा सुरू होत्या, त्या आता वाफाच राहिल्या. एकनाथ शिंदे यांचं राज्याच्या विकासासाठी मोठं योगदान आहे. आम्ही आधीपासून त्यांचं काम पाहत आलो आहोत.
फडणवीस मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी चांगलं काम केलं असून एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो. आमचे तिन्ही नेते सांगायचे आमची लढाई मुख्यमंत्रिपदासाठी नाही. महाविकास आघाडीत तर 8 मुख्यमंत्री तयार झाले होते. महाविकास आघाडी ही मुख्यमंत्रिपदासाठी लढत होती. तर आम्ही जनतेच्या विकासासाठी लढत होतो. त्यामुळे जनतेने आम्हाला स्वीकारलं, असं बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.