मुंबई: रिअल इस्टेट व ऑफशोअर बेटिंग क्षेत्रामध्ये दिशाभूल करणाऱ्या आणि बेकायदेशीर जाहिरातींचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे, असा निष्कर्ष अॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड काऊन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) च्या अहवालातून काढण्यात आला आहे. रिअल इस्टेट हे आचारसंहितेतील नियमांचे
सर्वाधिक उल्लंघन करणारे क्षेत्र ठरले, तपास करण्यात आलेल्या एकूण जाहिरातींपैकी ३४ टक्के जाहिराती याच क्षेत्रातील होत्या.
एएससीआयने आपला हाफ-इअरली कम्प्लेन्ट्स रिपोर्ट २०२४-२५ प्रकाशित केला आहे. एप्रिल आणि सप्टेंबर २०२४ दरम्यान एएससीआयने ४०१६ तक्रारीची पाहणी केली व ३०३१ जाहिरातीचे अन्वेषण केले. पाहणी केलेल्या या जाहिरातींपैकी ९८ टक्के जाहिरातींमध्ये काही सुधारणांची गरज आढळून आली. एएससीआयने डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर ठेवलेल्या देखरेखीमधून २८३० जाहिरातीवर प्रक्रिया करण्यात आली, ज्या अन्वेषणासाठी हाती घेण्यात एकूण जाहिरातींमधील ९३ टक्के जाहिरातींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या. अन्वेषण करण्यात आलेल्या २०८७ जाहिराती कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या होत्या. यापैकी १०२७ जाहिरातीची तक्रार एएससीआय आणि महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटी (महारेरा) यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत महारेराकडे नोंदवण्यात आली.
बेकायदेशीर बेटिंगला उत्तेजना देणाऱ्या आणखी ८९० जाहिरातीची तक्रार माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे (एमआयबी) दाखल करण्यात आली आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडिज कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १५६ जाहिरातींची तक्रार आयुष मंत्रालयाकडे नोंदवण्यात आली, तर मद्याची थेट जाहिरात करणाऱ्या १० जाहिराती व डोपफेक्सच्या तक्रारीसंदर्भातील ४ जाहिरातीना एमआयबीकडे सुपूर्द करण्यात आले. नियमानुसार तपास करण्यात आलेल्या उर्वरित ९४४ प्रकरणांपैकी ५३ टक्के जाहिरातींविषयीच्या तक्रारींची सूचना एएससीआयकडून प्राप्त झाल्यानंतर जाहिरातदारांकडून प्रतिदावा करण्यात आला नाही. रियाल्टी (३४ टक्के), बेकायदेशीर बेटिंग (२९ टक्के), आरोग्य (८ टक्के), पर्सनल केअर (७ टक्के), आणि अन्न व पेये (६ टक्के) या क्षेत्रातील जाहिराती पहिल्या पाच श्रेणीमध्ये असल्याचे आढळून आले, ज्यांनी आचारसंहितेचे स्वर्वाधिक उल्लंघन केल्याचे दिसले.
यासंदर्भांत एएससीआयच्या सीईओ मनीषा कपूर म्हणाल्या, बेटिंग आणि रियाल्टी सारख्या क्षेत्रांमध्ये सरकारी नियामक यंत्रणांच्या सोबतीने आम्ही करत असलेल्या कामाचा प्रभाव पडत आहे. अजूनही बराच लांबचा पल्ला गाठायचा असला तरीही अशा भागीदारीमुळे अधिक चांगल्या देखरेखीला वेग आला आहे.