-गणेश सुळ
केडगाव : परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर ऊसतोडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दौंड भागातील कारखान्याचे धुराडे पेटले खरे, मात्र कारखान्याकडे ऊसतोड करणा-या मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ऊसतोडीच्या व्यवस्थापनात मोठ्या अडचणी तयार झाल्या आहेत. यातही वशिलेबाजी आल्याने ऊसतोड कार्यक्रमाचे गणित यंदा पूर्णता बिघडले आहे. त्यामुळे कारखान्याकडे केलेल्या नोंदणीनुसार ऊसाला तोड मिळेल का नाही? या बाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. अन् तशी परिस्थिती सत्यात उतरताना दिसत आहे.
अवकाळीशी झगडता झगडता नाकी नऊ आले असताना देखील शेतक-यांनी आपले पिक टिकवले. परंतु ऊसाला वेळेत तोड मिळत नसल्याने शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत. दौड तालुक्यांत कारखान्याकडे टोळीची यंत्रणा अपुरी पडत असल्याने कुणी टोळी देता का, टोळी.., असे म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उसाला तोड मिळविण्यासाठी कारखान्याच्या यंत्रणेकडे मनधरणी करावी लागत आहे.
अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे उसाला तुरे फूटण्यास सुरुवात झाली आहे. तुरे फूटल्याने ऊस पोकळ बनून वजन देणार नाही, अशी चिंता सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. यातच कारखान्यात ऊसतोड मजुरांच्या टंचाईची भर पडली आहे. या सगळ्यात मात्र शेतकरी भरडले जात आहे. टोळी मिळविण्यापासून ऊसतोड करेपर्यंत पैसे द्यावे लागत असल्याने शेतकरी या सर्व यंत्रणेसमोर हतबल झाले आहेत. त्यामुळे सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाली कोण, असा सवाल समोर येत आहे.
ऊसतोड द्यावी यासाठी शेतकऱ्यांकडून सध्या कारखान्याचे उंबरठे झिजविले जात आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या समस्येकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्यामुळे व्यथा मांडायची कुणाकडे, अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची बनली आहे.