शिरुर : मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील पोळ वस्ती नजिक शॉर्ट सर्किट होऊन एका शेतकऱ्याचा चार एकर ऊस जळून खाक झाला आहे. सदर घटना सोमवारी (दि.२५) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. शेतकरी अविनाश बापुराव सोनवणे यांनी गट ६१७/१ या शेतात चार एकर आडसाली ऊसाची लागवड केली होती. सदर ऊसाची काही दिवसांतच तोडणी होणार होती. सोनवणे यांनी या शेतात खासगी रोहित्र बसवलेले आहे. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी शॉर्ट सर्किट होत असल्याबाबत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी माहिती दिली होती.
परंतु, सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट होऊन ऊसाला आग लागली. या आगीत ऊस पिकासह ठिबक संचही जळून नष्ट झाला आहे. त्यामध्ये सुमारे बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकरी मागणी करीत आहेत. दरम्यान, महावितरण कंपनीचे अधिकारी शाखा अभियंता इर्शाद शेख व वायरमन सौरभ जगताप यांनी सदर ठिकाणची पाहणी करुन पंचनामा केला आहे.