पुणे: आपल्या समृद्ध लष्करी वारशासाठी प्रसिद्ध असलेले पुणे शहर १५ जानेवारी २०२५ रोजी प्रथमच प्रतिष्ठित लष्कर दिन संचलनाचे यजमानपद सांभाळण्यास सज्ज झाले आहे. पुण्याच्या लष्करी इतिहासातील हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. भारतीय लष्कराने सध्या सुरू असलेल्या गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) दरम्यान या आगामी संचलनासाठी प्रमोशनल व्हिडीओचे अनावरण नुकतेच केले. याला सिनेफिल्स, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि उद्योग जगतातील नेत्यांकडून उत्साही प्रतिसाद मिळाला. लष्कराचे पहिले कमांडर-इन- चीफ म्हणून फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांची १९४९ मध्ये झालेली नियुक्ती, जे स्वातंत्र्योत्तर लष्करी नेतृत्वाचे प्रतीक आहे, याच्या स्मरणार्थ हे लष्कर दिन संचलन आयोजित केले जाते.
पारंपरिकरीत्या दिल्लीमध्ये होणारे हे संचलन २०२३ पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये करण्यास आरंभ झाला. सुरुवात बंगळुरूपासून झाली. त्यानंतर २०२४ मध्ये लखनऊमध्ये आयोजन झाले. २०२५ च्या संचलनासाठी पुण्याची निवड झाली आहे. या शहराचे सशस्त्र दलांशी असलेले ऐतिहासिक संबंध आणि भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्यालय म्हणून प्रसिद्ध आहे. या वर्षीचे संचलन बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप आणि सेंटर येथे होणार आहे, ज्यामध्ये मार्चिंग दल, यांत्रिक स्तंभ आणि तांत्रिक प्रदर्शने असतील. ड्रोन आणि रोबोटिक्ससारख्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांसह, लढाऊ प्रात्यक्षिके आणि मार्शल आर्ट्स डिस्प्ले यासारख्या आकर्षक कामगिरीचा समावेश यावर यात भर असणार आहे.