पुणे : पुण्याच्या राजकारणाचा विचार केला, तर गणपती मंडळाचा कार्यकर्ता सुरुवातीच्या काळात कार्यकर्ता, नंतर अध्यक्ष होतो. तो काही वर्षांत नगरसेवक आणि नंतर आमदार होण्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यानुसार दर वेळी पुणे महापालिकेच्या सभागृहातील नगरसेवक हे आमदार झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी पुणे महापालिकेच्या विसर्जित सभागृहातून सचिन दोडके, प्रशांत जगताप, हेमंत रासने, आबा बागूल, अश्विनी कदम, साईनाथ बाबर हे विधानसभेत जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यापैकी केवळ पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने हे विधानसभेत पोहोचले आहेत. इतरांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
२०१७ मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. पालिकेच्या सभागृहात भाजपची एकहाती सत्ता होती. त्यानंतर २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक पार पडली होती. त्या वेळी सभागृहातून सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, चेतन तुपे, मुक्ता टिळक, सुनील कांबळे हे पालिकेतील नगरसेवक आमदार झाले होते. तर, १७ महिन्यांपूर्वी पार पडलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत नगरसेवक रवींद्र धंगेकर हे आमदार झाले होते. त्यांपैकी आता पुन्हा सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, चेतन तुपे, सुनील कांबळे, रवींद्र धंगेकर हे पाच जण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी माजी नगरसेवक एकमेकांसमोर होते.