मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त आमदार दिलीप वळसे पाटील आज ( दि.२५) खासदार शरद पवारांची भेट घेणार आहेत. ही भेट कोणतीही राजकीय चर्चा करण्यासाठी नव्हे, नियमित बैठकीसाठी आहे असं वळसे पाटील स्पष्ट केले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना पाडा, असं आवाहन शरद पवारांनी केलं होतं. त्यानंतर दोघांची ही पहिलीच भेट असणार आहे.
खासदार शरद पवार प्रमुख असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची मुंबईत बैठकर पार पडत आहे. दिलीप वळसे पाटील हे या संस्थेचे ट्रस्टी असल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्या ठिकाणी शरद पवार आणि त्यांची भेट होणार आहे. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा होणार नसली, तरी आपण शरद पवांरांची विचारपूस करू असं दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांसोबत गेले. यामुळे पवारांसह अनेकांना धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात आंबेगावातून देवदत्त निकम यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली होती. त्यावेळी प्रचार करताना वळसे पाटील यांचा गद्दार असा उल्लेख करून त्यांना पाडा असं आवाहन शरद पवारांनी केले होते. या निवडणुकीत वळसे-पाटील यांचा १५०० मतांनी निसटता विजय झाला आहे.