मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची आज (दि. २५) बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पक्षाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये, आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली असून आमदार भास्कर जाधव यांच्याकडे शिससेना गटनेता पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय आमदार सुनील प्रभू यांच्याकडे पुन्हा एकदा प्रतोदपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत झालेल्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 20 आमदार
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पाणीपत झाले आहे. कारण, राज्यात महायुतीने तब्बल 236 जागांवर स्पष्ट बहुमत मिळवलं असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर, शिवसेना शिंदे गटानेही तब्बल 57 जागांवर विजय प्राप्त केला असून गेल्या कार्यकाळात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर जेवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते, त्यापेक्षा जास्त आमदार यंदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार असलेला पक्ष म्हणून ठाकरे गटाने बाजी मारली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर 16 जागांसह काँग्रेस असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 10 जागांवर विजय मिळाला आहे.