लोणी काळभोर : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ काळभैरवनाथाचा कालाष्टमी जन्मोत्सव सोहळा अंबरनाथ मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महामस्तकाभिषेक, भजन, जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन, तुलसीदास रामायणाचे पठण आदी धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कालाष्टमी जन्मोत्सवानिमित्त अंबरनाथाचे मंदिर नव्या नवरी सारखे सजविण्यात आले होते. शनिवारी पहाटे 5 वाजता श्रीमंत अंबरनाथ व माता जोगेश्वरीला भाविकांच्या उपस्थितीत महामस्तकाभिषेक करण्यात आला. सकाळी 7 ते 9 या दरम्यान 101 दांपत्यांच्या हस्ते लघुरुद्र आभिषेक व होमहवन पार पडले. सकाळी 8 ते दुपारी 4 या दरम्यान सिताराम भजनी मंडळाच्या वतीने श्री तुलसीदास रामायणाचे पठण झाले. तर राजस्थानी सत्संग भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. श्रीमंत अंबरनाथ भजनी मंडळाचे भजन झाले.
सत्यनारायणाची महापूजा शनिवारी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी 6 वाजता मंदिरात हजारो दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. हभप दत्ता महाराज काळभोर यांचे जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन रात्री दहा वाजता झाले. मध्यरात्री बारा वाजता श्रीमंत अंबरनाथाचा जन्मोत्सव सोहळा पार पडला. या वेळी परिसरात फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करण्यात आली होती. उत्सवानिमित्त संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
श्रींची पारंपरिक शाही मिरवणूक ढोल, ताशे व बॅन्डच्या सुमधूर सुरांत रविवारी सकाळी 9 ते 12 या दरम्यान काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीत विद्यार्थिनी, महिला व तरुणी डोक्यावर मंगलकलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून फुगड्या खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. तर काही विद्यार्थिनींनी लेझीमवर ठेका धरला.
या मिरवणुकीदरम्यान घोड्याचे नृत्य हा आकर्षणाचा विषय ठरला. भजनी मंडळींनी हरीनामाच्या जयघोषात लोणी काळभोरकरांना मंत्रमुग्ध केले. अशा भक्तिमय वातावरणात श्रीमंत अंबरनाथ काळभैरवनाथाची कालाष्टमीची मिरवणूक पार पडली. त्यानंतर दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट व श्रीमंत अंबरनाथ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.