उरुळी कांचन (पुणे) : शिरूर – हवेली मतदारसंघातील यशवंतसह घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी तसेच पुणे – सोलापूर व पुणे – नगर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिरूर- हवेलीचे नवनिर्वाचित आमदार माऊली आबा कटके यांनी केले आहे. शिरूर – हवेली विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माऊली आबा कटके यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांच्याशी ‘पुणे प्राईम न्यूज’ने संवाद साधला. यावेळी आमदार माऊली आबा कटके यांनी वरील माहिती दिली.
शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना व हवेलीतील यशवंत सहकारी साखर कारखाना हे दोन्ही कारखाने सद्यस्थितीत बंद आहेत. तसेच या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा शेतीपूरक जोडव्यवसाय असलेला दुग्धव्यवसायही अडचणीत सापडला आहे. हवेली तालुक्याच्या पुर्व भागातील बहुतांश गावांना सतावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या नागरीकरणामुळे नागरी सुविधांवर येणारा ताण, महामार्गावर नेहमी होत असलेली वाहतुक कोंडी, कचऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी विधानसभेत पाठपुरावा करून सदर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कटके यांनी म्हटले आहे.
अष्टविनायकांपैकी असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी, रांजणगावचा महागणपती मंदिर परिसरात व गावाला सोईसुविधा देण्यासाठी तत्पर असून लोणी काळभोर येथील रामदरा शिवालयकडे जाण्यासाठी महामार्ग जोडून घेणार आहे. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या हिताच्या योजना शिरूर – हवेलीतील मतदारसंघात पोहोचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार कटके यांनी सांगितले.
दरम्यान, पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातून लोणी काळभोरपर्यंत मेट्रो विस्ताराला चालना देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पुढे ही मेट्रो उरुळी कांचनपर्यत नेण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच पुणे – सोलापूर व पुणे नगर महामार्गावर अनेक वर्षांपासूनचा वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी उड्डाणपुल उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार माऊली आबा कटके यांनी म्हटले आहे.