लोणीकंद, (पुणे) : साखरपुडयाच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. या गुन्ह्यात दीड महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी वाघोली येथील जे.एस.पी.एम. कॉलेज परिसरातून ताब्यात घेतले आहे.
आर्य अनुपसिंग ठाकुर (वय 20, रा. निओ सिटी, फेज 1, बिल्डिंग सी, फ्लॅट नं. 407, बकोरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वीच त्याचे साथीदार ऋषिकेश रमेश झेंडे (वय-23), अमन मुबारक शेख (वय-23), मनिष अनिल उबाळे (वय 20, तिघे रा. वाघोली) यांना अटक केले आहे. तर आर्य ठाकूर हा फरार होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक शनिवारी (ता. 23) लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत विधानसभा निवडणुक निकाल 2024 च्या अनुषंगाने रेकॉर्डवरील आरोपी तपासणी तसेच गुन्हे प्रतिबंधक गस्त घालीत होते. यावेळी लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आर्य ठाकुर हा वाघोली येथील जे.एस.पी.एम. कॉलेज परिसरात थांबला असल्याची माहिती पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे व सचिन पवार यांना मिळाली होती.
सदर ठिकाणी जावुन आरोपी आर्य ठाकुर याला ताब्यात घेण्यात आले. नमूद आरोपीताकडे चौकशी करून लोणीकंद पोलीस ठाणे येथे खात्री केली असता नमुद गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांकडून चौकशी केली असता आरोपीने दीड महिन्यांपूर्वी साखरपुडयाच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यातील तिघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. आर्य ठाकूर याची वैदयकीय तपासणी करुन त्यास पुढील कायदेशीर कारवाईकामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन घाडगे, सुहास तांबेकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.