अमरावती : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यात लढत पाहावयास मिळाली. एक्झिट पोलमध्ये महायुतीची सत्ता येईल, असे काही संस्थांचे निरीक्षण आहे. तर काही संस्थांनी महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा अंदाज व्यक्त वर्तवला आहे. अशातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा तिसऱ्या आघाडीच्या रूपाने निवडणूक रिंगणात असलेल्या परिवर्तन महाशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी मात्र आमच्याशिवाय राज्यात कोणीही सत्ता स्थापन करू शकणार नाही, असा दावा केला आहे.
बच्चू कडू यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत भाजप आणि काँग्रेसवर टीकेची झोड उठविताना प्रहारचे किमान दहा आमदार निवडून येतील. परिवर्तन महाशक्ती आघाडी मिळून पंधरा आमदार होतील. या आमदारांशिवाय कोणीही राज्यात सत्ता स्थापन करू शकणार नाही, असे कडू यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, माझ्या अन्तालपूर मतदारसंघात भाजपने खालच्या पातळीवर प्रचार केला.
काँग्रेसच्या नेत्यांनी काही ठिकाणी भाजपला मतदान करायला सांगितले, तर भाजपने काही ठिकाणी काँग्रेसला मतदान करा, असा प्रचार केला. या दोन्ही पक्षांच्या डोक्यात फक्त बच्चू कडूला पराभूत करणे हेच होते; पण मी निवडून येणारच आहे. नंतर संपूर्ण सत्ता अपक्ष व लहान पक्षांकडे राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा, हे मोठे पक्ष ठरविणार नाहीत. आम्ही कोणाला सोबत घ्यायचे ते आता आम्ही ठरवणार आहोत, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.