-पोपट पाचंगे
कोरेगाव : आंबेगाव – शिरुर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान शांततेत व उत्साहात पार पडले. दोन्ही उमेदवारांनी विजयाचे मोठे दावे केले असून, आम्हीच गुलाल उधळणार असा विश्वास दोन्ही उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे मतदार घड्याळाला साथ देणार कि तुतारी वाजणार? याचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
या निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी मुख्य लढत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांच्यात होत आहे. येथील निवडणूक निकालाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे, मात्र मतदार सुज्ञ असल्याने घड्याळ चालणार कि तुतारी वाजणार अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
वळसे पाटील यांचे गेल्या 35 वर्षातील विविध विकासकामे, त्यांनी आणलेला भरघोस निधी, मतदारसंघात कार्यकर्त्यांचे गावोगावी असलेले मजबूत जाळे ही वळसे पाटील यांची जमेची बाजू ठरली असली तरी त्यांचे एकेकाळचे सहकारी देवदत्त निकम यांनी हातात तुतारी घेत माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून उमेदवारी मिळविली. गुरु शिष्याच्या लढाईमुळे निवडणूक चुरशीची झाली असली तरी या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सत्तेत सहभाग महत्वाचा
दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातून फक्त निवडून जाणे आंबेगाव शिरुरकरांसाठी महत्वाचे नसून, त्यांनी सत्तेत सहभागी होणे गरजेचे आहे. यामुळे निकालादरम्यान नेमके काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या वळसे पाटील यांच्यामुळे आंबेगाव शिरुरला भरीव निधी मिळाला. त्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी सत्तेत सहभागी होणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य जनतेचे मत आहे.
आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 16 हजार 501 पुरुषांनी तर 1 लाख 3 हजार 502 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
एकूण मतदान – 2 लाख 20 हजार 3 मते.