सांगली : जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत गॅस गळती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून इतर पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
सुचिता उथळे (वय-50, येतगाव) आणि नीलम रेठरेकर (वय-26, मसूर) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अन्य पाच रुग्णांवरती आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत अचानक गॅस गळती झाली. ही बाब सुरुवातीला लक्षात आली नाही. यामुळे अचानक कंपनीत काम करणारे 9 कर्मचाऱ्यांची प्रकृती खराब झाली. यामुळे कंपनीत मोठा गोंधळ निर्माण झाला. कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने या सर्वांना कराड येथील सह्याद्री व श्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सात जणांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना दोन महिलांचा मृत्यू झाला. तर इतर पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शेलार साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे व माजी आ. पृथ्वीराज देखमुख यांनी भेट देत सर्व टेक्निकल बाबींवर चर्चा केली.