बारामती : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून आता निकालाची वाट बघितली जात आहे. येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. तेव्हा राज्यातील चित्र नेमकं काय असणार आहे? हे बघायला मिळेल. निकाल कोणाच्या बाजूला झुकेल? अमुक मतदारसंघात कोण बाजी मारेल? अशी चर्चा रंगू लागली आहे. अशातच बारामती मतदारसंघाच्या लढतीकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले आहे. दोघांमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळाली. गतवेळच्या तुलनेत यंदा मात्र मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला आहे. त्यामुळे हे नवमतदारच बारामतीचा आमदार ठरवणार आहेत. त्यामुळे वाढलेले मतदान कुणाच्या पारड्यात पडणार आहे? हे बघणं रंजक ठरणार आहे.
यंदा बारामती विधानसभेसाठी ३ लाख ८० हजार ६०८ मतदारांपैकी २ लाख ७२ हजार ४०८ मतदारांकडून मतदान करण्यात आले आहे. यामध्ये १ लाख २९ हजार ४०१ स्त्रिया, तर १ लाख ५२ हजार ९९६ पुरुष मतदार, तसेच इतर ११ मतदारांचा समावेश आहे. यंदा ७१. ०३ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये ६८.२८ टक्के मतदान झाले होते. त्यानुसार तुलनेने यंदा मतदानामध्ये ३.२९ टक्के वाढ झाली आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अजित पवार यांना १ लाख ९५ हजार ६४१ मते मिळाली होती. तर तत्कालीन भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना ३० हजार ३७६ मते मिळाली होती. अजित पवार यांना त्यावेळी १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांचे विक्रमी मताधिक्य मिळाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार असे निवडणुकीचे समीकरण सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच बारामतीमध्ये यंदा विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात जिरायती भागातील पाणीप्रश्नासह, रोजगार, नीरा नदी प्रदूषण आदी अनेक मुद्दे आहेत. यंदा महाविकास आघाडीने उपमुख्यमंत्री पवार यांच्याविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. जे राजकारणात नवखे आहेत. त्यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढविलेली नाही. त्यांना थेट विधानसभेच्या आखाड्यात उतरविण्यात आले आहे.
आता तरुणांना संधी द्या, युगेंद्र पवार हे तरुण उच्चशिक्षित आहेत, त्यांना शेतीची, कारखानदारीची जाण आहे, त्यांना निवडून द्या, अशी साद शरद पवार यांनी बारामतीकरांना घातली होती. तर उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती शहरासह तालुक्यासाठी स्वतंत्र जाहिरनामा प्रसिद्ध करीत विकासाचे ‘व्हिजन’ मांडले होते. त्यासाठी बारामतीकरांनी निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले होते. दरम्यान, बारामतीकर कोणाला पसंती देणार हे मात्र आता मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.