पुणे : मनी लॉड्रिंगची भिती दाखवून एका आय टी इंजिनिअरची सायबर चोरट्यांनी तब्बल 6 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 9 ते 19 नोव्हेंबर 2024 दरम्यान राहत्या घरी घडली आहे. याबाबत पाषाण येथील एका 59 वर्षाच्या आय टी इंजिनिअरने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पत्नी व मुलीसह पाषाणला राहतात. 9 नोव्हेंबर रोजी एक फोन आला. तुमच्या नावावर मनी लॉड्रिंग करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्हाला अटक होऊ शकते, असे सांगून त्यांना भिती दाखविण्यात आली. व्हिडिओ कॉलद्वारे सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. त्यावर फिर्यादी यांनी आपण तसे काही केले नसल्याचे सांगितले.
तुम्ही केले नसेल तर तुमच्या सर्व आर्थिक व्यवहाराची, बँकेची चौकशी करुन तसे सर्टिफिकेट घ्यावे लागेल, असे सांगून तुमचे वय पाहता तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट करत आहोत, असे सांगून ही बाब कोणाला सांगू नका. व्हिडिओ कॉल बंद करु नका, अशी धमकी दिली. या सर्व बाबीला घाबरुन ते सांगतील तसे फिर्यादी करत राहिले. त्यांनी ही बाब आपली पत्नी व मुलीलाही सांगितली नाही.
दरम्याण, चौकशी झाल्यावर तुमचे पैसे परत मिळतील, असे सांगून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. सायबर चोरटे सांगतील, त्या खात्यात पैसे ट्रान्सफर करत राहिले. त्यांनी एकूण 6 कोटी 29 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर सायबर चोरट्यांचा संपर्क झाला नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.