हडपसर (पुणे) : समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी कोंढवा येथील दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हडपसर येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत सुदामराव जगताप (वय 47, रा. अनसूया निवास, वानवडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझहर तांबोळी आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप निवडणूक लढवत आहेत. जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार आहेत. अझहर तांबोळी आणि साथीदारांनी समाजमाध्यमात जगताप यांच्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर प्रसारित केला. दरम्यान, तांबोळी आणि साथीदारांनी दिशाभूल करणारा संदेश प्रसारित केल्याचे जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक बेंद्रे तपास करत आहेत.