इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून हर्षवर्धन पाटील तर महायुतीकडून दत्तात्रय भरणे या दोघांमध्येच लढत होत आहे. मात्र, येथे महाविकास आघाडीचे प्रवीण माने यांनी बंडखोरी केल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे इंदापुरकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यासाठी आज (दि. २०) मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरु झाली आहे. अत्यंत चुरशीने मतदान होत आहे.
अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या दादागिरीची एक व्हिडीओ समोर आला आहे. तालुक्यातील शिरसटवाडी येथील मतदान केंद्रावर नागिरकांना दमदाटी करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्यावेळी देखील आमदार दत्ता भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावातील मतदारांना दमदाटी केली होती. त्याचाही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. निवडणूक संपल्यानंतर माझ्याशी गाठ आहे. गावात कोणाला सोपं नाही, वाटच लावेन. निवडणुका होतील. सहानंतर तुम्हाला माझ्याशिवाय कोण आहे. जास्त मस्ती केली, तर मस्ती उतरवेन असंही भरणे म्हणाले होते. आता देखील त्याचीच पुनरावृत्ती भरणे यांच्याकडून झाल्याची चर्चा इंदापूरात आहे.