सोलापूर : सोलापूरात महानाट्य बघायला मिळालं आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा झटका दिला असून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दर्शवत, त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी या मतदारसंघातील नागरिकांना केले आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भूमिकेनं ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. प्रणिती शिंदे यांनी ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचे सांगत काडादी यांना काँग्रेसचा एबी फॉर्म न देत महाआघाडीचा धर्म पाळला असल्याचाही दावा केला आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभामतदारसंघातून ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचा उमेदवार देण्यात आला आहे. परंतु, खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचार केला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जागा वाटपात या मतदारसंघावर केलेला दावा चुकीचा असल्याचे सांगत आम्ही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले आहे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले आहे.
सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले?
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, आम्ही याठिकाणी काडादींना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. या मतदारसंघात चांगलं वातावरण असून ते चांगले, शांत आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारे आहेत. या मतदारसंघातून मानेंना उमेदवारी दिली होती, पण अर्ज मिळाला नाही, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. उमेदवारीसाठी शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली. देवकाते मी दोनवेळा निवडून आलो आहे, हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. एकवेळा त्यांचा उमेदवार निवडून आला आहे.
आघाडी धर्म आम्ही पाळला : प्रणिती शिंदे
खासदार प्रणिती शिंदे प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, या मतदारसंघाने मुख्यमंत्री निवडून दिला आहे. तसेच आम्ही आघाडी धर्म पाळला असून आम्ही एबी फाॅर्म दिलेला नाही. या जागेवरून काही गैरसमज झाले होते, चुकून गेलं असेल असं वाटलं, पण आम्ही काडादींच्या मागे आहोत. जो जिता वही सिकंदर होणार.