नवीन लग्न झालेले अर्थात नवविवाहित असो किंवा वयस्क जोडपे सुखी वैवाहिक जीवन राहावं यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. वेळप्रसंगी काही चुका नसतानाही सामंजस्याची भूमिका घेताना दिसतात. पण, जर आपली आग्रही भूमिका राहिली तर नात्यात कटुता येऊ शकते. त्यामुळे काही गोष्टींचे पालन केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
पती-पत्नीचे नाते आयुष्यभराचे असते, नेहमी एकत्र राहणारे हे नातं आहे. त्यामुळे कोणताही वाद झाला तर जोडीदारासमोर नमतं घ्यायला अजिबात संकोच करू नका. तुमच्या नात्यात अहंकार येऊ देऊ नका. नेहमी एखाद्याच्या दृष्टिकोनावर ठाम राहणे आणि इतरांचे न ऐकणे केवळ वैयक्तिकच नव्हे तर व्यावसायिक जीवनातही हानिकारक ठरू शकते. हे अहंकाराचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही पती असो वा पत्नी, या सवयी सोडून द्या आणि नात्यात प्रेम वाढवण्याचा प्रयत्न करा.
पती-पत्नीने नेहमी एकमेकांवर प्रेम व्यक्त केले पाहिजे आणि एकमेकांचे कौतुक देखील केले पाहिजे. तुमच्या जोडीदाराला आनंद देणाऱ्या गोष्टी तुमच्या वैवाहिक जीवनाचा भाग बनवल्या पाहिजेत. तुमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल विचार करा आणि तुमच्यातील अशा कोणत्या गोष्टी होत्या, ज्यांनी तुम्हाला एकमेकांच्या जवळ आणले, या गोष्टीही लक्षात आणा.
प्रेमापेक्षा तुमच्या जोडीदाराचा आदर महत्त्वाचा आहे. प्रत्येक नातेसंबंधात असा एक मुद्दा येतो जेव्हा तुमच्या जोडीदाराला तुमच्या वागण्याने किंवा तुमच्या काही बोलल्याबद्दल वाईट वाटू शकते, त्यामुळे मतभेदाच्या परिस्थितीतही एकमेकांचा आदर राखा. त्याने नातेसंबंध दृढ राहू शकतं.