नागपूर : नागपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार काटोलकडे जात असताना बेलफाट्याजवल घडला आहे.
नामक काय घडलं?
सोमवारी संध्याकाळी काटोल विधानसभा मतदारसंघामधील नरखेड येथील सांगता सभा आटोपल्यानंतर अनिल देशमुख तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत होते. त्यावेळी काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या वाहनाची समोरची काच फुटली आणि त्याचे तुकडे आतल्या बाजूला उडाले. त्यामुळे अनिल देशमुख जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्याने हल्ला केल्याचा दावा
माजी मंत्री अनिल देशमुख यांनी या दगडफेकीचा आरोप भाजपवर केला आहे. दुचाकीवरून आलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या घटनेची ठोस माहिती मिळालेली नसून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.