पिंपरी : खेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार, आमदार दिलीप मोहिते यांच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आहे. या प्रकरणी शनिवारी (दि.१६) म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुमित मच्छिंद्र मोहिते (वय २७, रा. शेल-पिंपळगाव, ता. खेड) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संबंधित मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (दि. १६) दुपारी दोनच्या सुमारास आंबेठाण येथे घडली. आंबेठाण येथील आर्जी प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक आश्विन गर्ग यांना अनोळखी व्यक्तीने शनिवारी दुपारी फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो आमदार दिलीप मोहिते बोलत असल्याची बतावणी केली. आम्हाला काही सहकार्य होईल का? आता अडचणीत आहे, असे म्हणून फोनवरील व्यक्तीने मदतीच्या नावाखाली आश्विन गर्ग यांच्याकडे पैसे अथवा इतर मालमत्ता मागून फसणुकीचा प्रयत्न केला. सहायक फौजदार मोरे तपास करत आहेत.