बारामती : १९६७ मध्ये इथल्या वडिलधाऱ्या लोकांनी मला आमदार बनवले, त्यानंतर मी काम केले. माझ्या नंतर आमदार म्हणून अजित पवारांना निवडून दिले. त्यांनी काम केलं, हे मी अजिबात नाकारत नाही. युगेंद्र पवार हे उच्च शिक्षित आहेत, त्यांनी परदेशात शिक्षण घेतले आहे. त्यांच्यामध्ये लोकांच्या प्रश्न सोडवण्याची धमक आहे. ते ठिकठिकाणी फिरुन माहिती घेत आहेत, त्यांची ही काम करण्याची पद्धत आहे. मात्र, आता पुढच्या पिढीला संधी देण्याची गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनी युगेंद्रला निवडून द्या”, असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले. ते बारामती येथील प्रचार सांगता सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र काय चीज आहे, हे संपूर्ण देशाला लोकसभा निवडणूकीने दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत होते की, भाजप प्रणित एनडीएच्या 400 जागा निवडून द्या. कारण त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची होती. मात्र, तुम्ही आम्हाला मोठी शक्ती दिली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे 48 पैकी 31 खासदार तुम्ही निवडून दिले.
पुढे बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांचा काय गुन्हा होता ?त्यांना शेतीमालाची किंमत मिळत नाही, कर्जबाजारीपणा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. महाराष्ट्रात वीस हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कारण त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नव्हता. खासकरून विदर्भात सोयाबीनच्या भावाचा प्रश्न अधिक गंभीर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, असंही पवार म्हणाले.
बहीण लाडकी आहे, त्यांचा सन्मान जरुर करा. परंतु, एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या कालखंडात महिलांवरील अत्याचार झाल्याचे प्रमाण जास्त आहे. मागील 2 वर्षात 67 हजार भगिनींवर अत्याचार झाले आहेत. महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत. एकूण 64 हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत. जे लाडकी बहीण बोलत आहे, त्यांनी 64 हजार मुलींचं रक्षण केल का? ही सांगण्याची धमक त्यांच्यामध्ये नाही, अशी जोरदार टीका शरद पवारांनी यावेळी केली.