नाशिक : प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये पाच कोटी रुपयांहुन अधिक रोकड जप्त केली आहे. यासह पोलिसांनी एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडीदेखील जप्त केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात विधानसभा आज निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. त्यातच आता नाशिकमधील या घडामोडीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये सकाळी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापा टाकला आहे. त्यामध्ये पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय राजकीय नेत्यासह गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
पोलिसांकडून या घटनेचा तपास अद्याप सुरु आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे. इतकी मोठी रक्कम कुठून आणि का आणली? हे पैसे कुणी दिले? कशासाठी दिले? यासारख्या प्रश्नांची पोलिसांकडून सरबत्ती सुरु आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला नेता कोणत्या राजकीय पक्षाचा आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.