मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या बुधवारी (दि. 20) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच अनेक राजकीय घटना घडताना दिसत आहेत. मुंबईत रविवारी महाविकास आघाडीची सभा पार पडली. मुंबई येथील सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे आभार मानले. ‘पंकजाताई तू एक फार मोठं काम केलंस, महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस, जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरुन काढून स्वत:च्या डोळ्यावर बांधली होती, तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरील पट्टी काढली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, भाजपाने ही माणसे आपल्यावर नजर ठेवायला आणलेली आहेत. उद्या यांचा आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकविण्याचा डाव आहे. हे तर आता फेक नरेटिव्ह नाही ना. कारण हे मी पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलत आहे. याचा अर्थ भाजपा इथे पराभूत झालेली आहे. त्यांचे लोक इथे राहिलेले नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहिलेल्या भाजपाप्रेमींवर भाजपाचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच त्यांना परराज्यातून माणसे आणून नजर ठेवावी लागत आहे. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
माझा आणखी एक प्रश्न आहे. अनेक निवडणुका बघितल्या, शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून फिरतोय. किमान दोन ते तीन वेळा माझी बॅग तपासली गेली. त्या बॅगच्या कंपनीला पत्र लिहिणार आहे. ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमा असं सांगणार आहे. बॅग हो तो ऐसी हो सबको लगे चेक करो. माझ्या बॅगा तपासल्या हरकत नाही, हे जे पथक फिरतंय, रात्री राहतात कुठंय, त्यांचा खर्च कोण करतंय, ते जे फिरतात त्यांच्या बॅगातील ढोकळे फाफडा कुठून आणलाय, कुणासाठी फिरतात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
‘महायुतीकडून बटेंगे तो कटेंगे घोषणा दिल्या जात आहेत. मी मुख्यमंत्री असतो तर, यांची अशी हिंमत झाली नसती. पण लक्षात घ्या, मुंबईवर घाला घातला तर ‘हम तुम्हे काटेंगे’, असे हिंदीत म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुतीला इशारा दिला.