वेल्हे : वेल्हे येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. राजगड तालुक्यातील किल्ले तोरणाकडे जाणाऱ्या पर्यटकांची मिनी बस शंभर फुटांहून अधिक खोल दरीत कोसळल्याने अपघाताची घटना घडली आहे. ही घटना रविवारी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या अपघातामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी पर्यटकांवर वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निलेश प्रताप कदम (वय-५०), संजय मधुकर पाटील (वय-४९, दोघे रा. बदलापूर, ठाणे) असं किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बसमधून (एम.एच. ४०, बी.एल ५८३१) बदलापूर येथील २५ पर्यटक किल्ले तोरणा गडावर जात होते. त्यावेळी पार्किंगच्या जवळच असलेल्या मोठ्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने चढावरून मागे येत बस खोल दरीत कोसळली. दरम्यान, सुदैवाने शंभर फुटावर झाडाला बस अडकल्याममुळे मोठी दुर्घटना टळली. तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. एकूण २५ पर्यटकांचे प्राण वाचले आहेत.
या अपघातामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले असून, इतर पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिनी बसमधील त्यांचे सहकारी सुरेंद्र मरळ यांनी दिली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, तोरणा गडाकडे जाणाऱ्या या भागात रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, गाडी पार्क करण्यासाठी डोंगर कपारीतून पार्किंगला जावे लागते. मात्र, रस्त्याच्या कडेला भिंती नसल्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंती असणे देखील तितकेच गरजेच आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी शासनाला केली आहे.